बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवा अन्यथा आम्ही उखडून टाकू! म्हाडाने संबंधित कंपन्यांना धाडली नोटीस

म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवा अन्यथा आम्ही ते उखडून टाकू आणि कारवाईचा खर्च तुमच्याकडूनच वसूल करू, अशी नोटीस म्हाडाने संबधित होर्डिंग कंपन्यांना धाडली आहे. त्यामुळे संबंधित जाहिरात कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी झाले होते. त्यामुळे मुंबईतील होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या म्हाडाने तातडीने आपल्या जमिनीवरील होर्डिंगचे सर्वेक्षण केले. म्हाडाच्या जागेवर होर्डिंग उभारण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असली तरी जागामालक म्हणून आधी म्हाडाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीत म्हाडाच्या जमिनीवर एकूण 62 होर्डिंग्स आढळले असून त्यापैकी केवळ दोनच होर्डिंगला म्हाडाने एनओसी दिली आहे. त्यामुळे बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाईसाठी म्हाडा आता अॅक्शन मोडवर आली आहे.

प्राधिकरणाची एनओसी बंधनकारक

म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर हार्ंडगचा परवाना तत्काळ रद्द करावा तसेच यापुढे म्हाडाची एनओसी असल्याशिवाय पालिकेने होर्डिंगला परवानगी देऊ नये असे पत्र आम्ही पालिकेला पाठवल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवा अन्यथा आम्ही ती उखडून टाकू आणि कारवाईचा खर्च तुमच्याकडूनच वसूल करू, अशी नोटीस आम्ही संबंधित जाहिरात कंपन्यांना बजावल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.