
पंतप्रधान आवास योजनेतील धूळ खात पडलेली हजारो घरे विकण्यासाठी म्हाडाने अनोखी शक्कल लढवली आहे. अत्यल्प उत्पन्न गट तसेच पीएमएवाय योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही त्रासाशिवाय झटपट कर्ज मिळावे यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आता वित्तीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोबरला ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील 9875 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. बोळींज (विरार), खोणी (कल्याण), शिरढोण (कल्याण), गोठेघर (ठाणे) आणि भंडार्ली (ठाणे) येथील घरांचा यात समावेश होता. 9875 घरांसाठी जेमतेम तीन हजारांच्या आसपास अर्ज आले होते. त्यातील 650 जणांनी ऐनवेळी घरे घेण्यास नकार दिला होता. बँकेकडून कर्ज न मिळणे हे त्यामागील मुख्य कारण होते.
अत्यल्प उत्पन्न गट किंवा पीएमएवाय योजनेतील लाभार्थ्यांना कमी उत्पन्नामुळे बँकांकडून घरासाठी कर्ज मिळण्यास अडचणी येतात. वारंवार कागदपत्रे घेऊन त्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात.
ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव न झाल्यामुळे त्यांना लॉटरीत लागलेले घरदेखील सोडावे लागते. वित्तीय संस्थेची नेमणूक केल्यामुळे विजेत्यांना कोणत्याही त्रासाशिवाय झटपट कर्ज मिळण्यास मदत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.