
नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा भूखंड चटई क्षेत्रफळासह भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या लिलावाद्वारे प्राधिकरणाला तब्बल 800 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. आतापर्यंत तीन कंपन्यांनी हा भूखंड भाडेपट्ट्यावर घेण्यासाठी म्हाडाकडे अर्ज केला असून इच्छुकांना 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर म्हाडालादेखील व्यावसायिक वापरासाठी जागा शिल्लक राहणार आहे. ना. म. जोशी मार्ग येथील 2200 चौरस मीटर आणि नायगावमधील 1700 चौरस मीटरचा व्यावसायिक भूखंड चटईक्षेत्रासह भाडेपट्ट्यावर देण्यासाठी म्हाडाने निविदा काढल्या आहेत. नायगाव येथील भूखंडाची बेस प्राईज 371.5 कोटी तर ना. म. जोशी मार्ग येथील भूखंडाची बेस प्राईज 438 कोटी रुपये ठरवली आहे.
पुनर्वसन प्रकल्पासाठी निधी
नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासाठी आम्हाला मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.