घराचा ताबा देण्यापूर्वी थकीत मालमत्ता कर, मेन्टेनन्स म्हाडा भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीत विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत विकासकांकडून प्राप्त घरे ‘जशा आहे त्या स्थितीमध्ये’ विक्रीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडातर्फे या घरांचा ताबा देण्यापूर्वी डागडुजी, दुरुस्ती करून दिली जाईल. तसेच यशस्वी अर्जदाराला सोडतीत लागलेल्या घराचा मालमत्ता कर व सोसायटीचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे भरून ताबा दिला जाईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सोमवारी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आज ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला.

या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेली 1762 घरे, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला मिळालेली 371 घरे, 33 (7) अंतर्गत मिळालेली 188 घरे तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील रिक्त राहिलेल्या 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत म्हाडाला मिळालेल्या व विखुरलेल्या 319 घरांचा सोडतीत समावेश आहे.