
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा प्राधिकरण आता मालामाल झाले आहे. 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये म्हाडाच्या जमा रकमेत 39.69 टक्क्यांची म्हणजेच 3,220.63 कोटी रुपयांची वाढ झाली. म्हाडाकडे 2023-24 मध्ये प्रत्यक्ष जमा रक्कम 8,113.88 कोटी रुपये होती तर 2024-25 मध्ये प्रत्यक्ष जमा रक्कम 11,334.51 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
म्हाडाकडे 2024-25 मध्ये महसुली जमेपोटी 5 हजार कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. यामध्ये एफएसआय, गुंतवणुकीवरील व्याज, इमारत परवानगी शुल्क, भाडे व सेवा आकारापोटी मिळणाऱ्या रकमांचा समावेश आहे. भांडवली जमेपोटी 1700 कोटी रुपये प्राप्त झाले असून यामध्ये म्हाडाच्या विविध मंडळांकडून सोडतीद्वारे घरांची विक्री, विक्रीअभावी पडून असलेल्या गाळ्यांच्या विक्रीसाठी विशेष योजना राबवून त्यातून प्राप्त झालेल्या रकमांचा समावेश आहे.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळास जिल्हा नियोजन कार्यालयाकडून 2200 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. ’म्हाडा’ने विविध योजनांसाठी शासनाकडे अर्थसहाय्य म्हणून 2,350 कोटी रुपये व आतापर्यंत म्हाडाने शासनास दिलेल्या कर्जाच्या प्रतिपूर्तीसाठी 1,050 कोटी रुपये असे एकूण 3,400 कोटींची मागणी केली होती. यापैकी शासनाने ’म्हाडा’ला अर्थसहाय्य म्हणून 1758.60 कोटी दिले आहेत.