मीठ आणि साखरेच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लॅस्टिक, कोट्यवधी ग्राहकांना ‘गुलीगत धोका’

हिंदुस्थानात विक्री केल्या जाणाऱ्या मीठ आणि साखरेच्या प्रत्येक ब्रँडच्या पॅकेटमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स आढळले आहे, असा दावा एका संशोधन अभ्यासातून करण्यात आला आहे. हिंदुस्थानात विकले जाणारे हे ब्रँड छोटे असो की मोठे परंतु त्यांच्या प्रत्येक पॅकेजमध्ये आणि अनपॅकेजमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स असतात, असा दावा ‘मायक्रोप्लॅस्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ नावाच्या अभ्यास टॉक्सिक्समध्ये करण्यात आला आहे. हे संशोधन टॉक्सिक्स लिंक नावाच्या पर्यावरण संशोधन संस्थेने तयार केले आहे.

टेबल मीठ, रॉक सॉल्ट, समुद्री मीठ, स्थानिक कच्चे मीठ आणि ऑनलाईन व स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेसह 10 प्रकारच्या मिठांची चाचणी केल्यानंतर या संस्थेने हा अभ्यास सादर केला आहे. मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये विविध प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. जसे की तंतू, गोळ्या आणि तुकडे. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मि.मी. ते 5 मि.मी. दरम्यान आढळून आला. आयोडीनयुक्त मिठामध्ये मायक्रोप्लॅस्टिक्सचे सर्वाधिक प्रमाण आढळले, जे बहुरंगी पातळ तंतू आणि फिल्म्सच्या स्वरूपात होते. अलीकडील संशोधनात फुफ्फुसे, हृदय व अगदी आईच्या दुधात आणि न जन्मलेल्या मुलांमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. या अहवालामुळे भीती पसरली.

एक किलो मिठात 90 तुकडे

मिठाच्या नमुन्यांमध्ये प्रतिकिलोग्रॅम मायक्रोप्लॅस्टिकचे प्रमाण 6.71 ते 89.15 तुकड्यांदरम्यान आढळले. आयोडीनयुक्त मीठ (89.15 तुकडे प्रतिकिलोग्रॅम) आणि सर्वात कमी प्रमाणात सेंद्रीय रॉक मीठ (6.70 तुकडे प्रतिकिलोग्रॅम) मध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे प्रमाण सर्वाधिक आढळले. तर दुसरीकडे साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लॅस्टिक्सचे प्रमाण 11.85 ते 68.25 तुकडे प्रतिकिलोग्रॅमपर्यंत आढळले.

मीठ आणि साखरेचा सर्वाधिक वापर

मायक्रोप्लॅस्टिक्स आरोग्य आणि पर्यावरण या दोघांनाही हानी पोहोचवू शकतात. हे छोटे प्लॅस्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती दररोज 10.98 ग्रॅम मीठ आणि वेगवेगळ्या पदार्थांद्वारे जवळपास 10 चमचे साखरेचा वापर करतो.