
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ने जगाला अक्षरश: भंडावून सोडलं आहे. टेक कंपन्यांनी आपलं सारं लक्षं AI कडे वळवलं आहे. देशादेशांमध्ये आता AI मध्ये काम करण्यासाठी चढाओढ लागली आहे. हिंदुस्थानात सुरू असलेल्या AI Summit मध्ये यावर चर्चा झाली आणि चीन कशाप्रकारे या तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करण्यासाठी पावलं उचलून अन्य देशातील कंपन्यांसाठी संकट बनत आहे हे देखील मांडण्यात आले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत चीन आपल्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान (Subsidies) देऊन पाठीशी घालत आहे. चीनच्या या धोरणामुळे भविष्यात अमेरिकन कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा गंभीर इशारा मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी दिला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये ते बोलत होते.
चीनचे जुनेच धोरण
ब्रॅड स्मिथ यांनी टेलिकॉम क्षेत्रातील उदाहरणे देत सांगितले की, ‘चीनने यापूर्वी हुवेई (Huawei) आणि झेडटीई (ZTE) सारख्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे अनुदान देऊन जागतिक बाजारपेठेत वर्चस्व मिळवले होते. यामुळे अनेक अमेरिकन कंपन्या बंद पडल्या, तर एरिक्सन आणि नोकिया सारख्या युरोपियन कंपन्या बचावात्मक भूमिकेत गेल्या. आता चीन हाच पॅटर्न ‘एआय’ क्षेत्रात राबवत आहे.’
डेटा सेंटर आणि स्वस्त ऊर्जा
सध्या डेटा सेंटर्स हा एआय पायाभूत सुविधांचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चीन आपल्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचा राष्ट्रीय गुंतवणूक निधी आणि संगणकीय गरजांसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देत आहे. हुवेई आणि अलीबाबा सारख्या चिनी कंपन्यांचे डेटा सेंटर्स जगभर पसरलेले आहेत आणि त्यांना अनुदान देणे चीनसाठी कठीण नाही, असेही स्मिथ यांनी नमूद केले.
‘डीपसीक’चा (DeepSeek) धक्का
जानेवारी २०२५ मध्ये चीनच्या ‘डीपसीक’ या स्टार्टअप कंपनीने आपला ‘R1’ हा एआय मॉडेल लाँच करून सिलिकॉन व्हॅलीला मोठा धक्का दिला होता. अत्यंत कमी खर्चात आणि कमी संगणकीय क्षमतेत हे मॉडेल तयार केल्याचा दावा कंपनीने केला होता. यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आफ्रिकेसारख्या विकसनशील बाजारपेठांमध्ये चिनी कंपन्या त्यांच्या स्वस्त दरामुळे अमेरिकन कंपन्यांना मागे टाकत आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव बंदी
मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना ‘डीपसीक’ वापरण्यास बंदी घातली आहे. डेटा सुरक्षा आणि चिनी प्रचाराचा (Propaganda) धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आमच्याकडे प्रगत चिप्स आणि विश्वासार्हता असली, तरी किमतीच्या बाबतीत आम्हाला चिनी अनुदानाशी स्पर्धा करावी लागणार आहे. यासाठी केवळ खासगी भांडवल पुरेसे नसून सरकारी पाठबळाचीही गरज आहे’, असे प्रतिपादन स्मिथ यांनी केले.
microsoft president brad smith warns against chinese ai subsidies
microsoft president brad smith says chinese government subsidies to ai firms like deepseek and huawei pose a threat to american tech companies.


























































