
जगभरातील तंत्रज्ञानविश्व ठप्प करणारी मायक्रोसॉफ्ट सर्व्हर प्रणाली हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबई विमानतळावरून सर्व फ्लाइट्स वेळेवर उड्डाण करू लागली आहेत. राजधानी दिल्ली तसेच इतर विमानतळांवरही विमानसेवा सुरळीत सुरू झाली आहे. काही ऑनलाइन सेवा आजही विस्कळीत राहण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण प्रणाली सुरक्षितरीत्या पूर्वपदावर आणण्याचे काम केले जात आहे, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी जाहीर केले आहे.
अमेरिकन अँटीव्हायरस कंपनी ‘क्राउडस्ट्राइक’च्या सॉफ्टवेअर अपडेटचा संपूर्ण जगाला फटका बसला. शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जवळपास 15 तास मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे जगभरातील 95 टक्के संगणक ठप्प झाले. जगभर जवळपास 4295 विमान उड्डाणे रद्द करावी लागली. आज दुसऱ्या दिवशी विविध विमान कंपन्यांनी आपली सेवा पूर्वपदावर आणली आहे. इंडिगो एअरलाइन्सने मात्र आजही काही विमाने उशिराने उड्डाण करतील, असे म्हटले आहे.
CrowdStrike म्हणजे काय?
CrowdStrike ही एक सायबर सुरक्षा फर्म आहे, जी कंपन्यांना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. हॅकर्स, सायबर हल्ले, रॅन्समवेअर आणि डेटा लीकपासून कंपन्यांचे संरक्षण करणे हे CrowdStrike चे मुख्य कार्य आहे.