मुंबई घडवणारा गिरणी कामगार ‘लाडका’ नाही का?  9 ऑगस्टपासून कामगार, वारसांचे भारतमाता सिनेमाजवळ बेमुदत उपोषण

मुंबईच्या उभारणीत गिरणी कामगारांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. मिंधे सरकारने मात्र कामगारांना मुंबईबाहेर काढण्याचे ठरवले आहे. मुंबईबाहेर मिळणारी घरे घ्या नाहीतर दावाच रद्द करू असा इशारा सरकारने दिल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप आहे. तो लोकशाही मार्गाने व्यक्त करण्यासाठी गिरणी कामगार आणि त्यांचे वारस येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मुंबई घडवणारा गिरणी कामगार सरकारला ‘लाडका’ नाही का, असा सवाल करतानाच, मुंबईतच घरे द्या, नाहीतर आमच्या अंत्ययात्रेला या, असा निर्वाणीचा इशाराच कामगारांनी दिला आहे.

गिरणी कामगार आणि कष्टकऱ्यांनी उभारलेल्या संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. लालबाग येथील भारतमाता सिनेमागृहाजवळ होणाऱ्या या आंदोलनात जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या समन्वयक समितीने केले आहे.

गिरणी कामगार गेली 42 वर्षे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातही गिरणी कामगारांनी प्राणाची बाजी लावली होती. त्याच गिरणी कामगारांचे मुंबईतील अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न गृहनिर्माण विभागाने 15 मार्च 2024 रोजी काढलेल्या जीआरमुळे होत आहे. गिरणी कामगारांनी मुंबई महानगर प्रदेशातील घरे नाकारली तर त्यांचा घरासाठी पुन्हा विचार केला जाणार नाही, यादीतून त्यांचे नाव वगळण्यात येईल असा हा जीआर सांगतो, अशी माहिती समन्वयक समितीचे हेमंत गोसावी यांनी दिली. हा जीआर काढल्यापासून त्याविरुद्ध सातत्याने आंदोलन करूनही सरकारकडून केवळ आश्वासनांशिवाय काहीच पदरी पडले नाही, असा त्यांचा आरोप आहे.

कामगारांच्या मागण्या…

  • गिरणी कामगारांना मुंबईतून हद्दपार करणारा गृहनिर्माण विभागाचा 15 मार्च 2024 चा आदेश रद्द करा
  • सर्व गिरणी कामगारांचे मुंबईतच कालबद्ध पुनर्वसन करणारा कायदा बनवा.
  • कामगार आणि वारसांना अधिकृत कागदपत्रे उपलब्ध करून द्या
  • घरासाठी अर्ज करण्यासाठी आणखी एक संधी द्या.