
शेगांव ते पंढरपूर या मार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा मार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून जातो. या मार्गाचे काम मेघा कंस्ट्रक्शन या कंपनीकडे देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासाठी कंपनीने बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा आरोप करण्यात येत होता. कंपनीने उत्खनन केलेल्या गौण खनिजाची शासनाकडे रॉयल्टी भरली नाही असाही आरोप कंपनीवर आहे. कळंबचे तत्कालीन तहसीलदार रोहन शिंदे यांनी यासंदर्भात कंपनीला 40 कोटीचा दंड ठोठावला होता. कंपनीवरील हा बोजा एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर फिरवण्यात आल्याचा नवा आरोप करण्यात येऊ लागला आहे. मस्सा गावचे रहिवासी असलेले जोतीराम वरपे आपल्या शेतात ठिबक सिंचनाची योजना राबवण्याच्या दृष्टीने तहसील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या सातबाऱ्यावर 40 कोटी 48 लाखांचा बोजा असल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून वरपे हे प्रचंड हादरलेले आहेत. त्यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकरांकडे धाव घेतली असून न्यायासाठी दाद मागितली आहे. यामागे शासनाचे बडे अधिकारी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.