
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसला मार्च 2025 च्या आर्थिक वर्षात एकूण 9 हजार 568.4 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय नागरिक उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी लोकसभा सभागृहात ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात अकासा एअर आणि स्पाईस जेटने याआधीच 1983.4 कोटी रुपये आणि 58.1 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची नोंद केली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला 3890.2 कोटी रुपयांचे नुकसान झाले तर याची शाखा असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसला 2024-25 मध्ये 5678.2 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तोटय़ात सुरू असलेली एअर इंडिया आणि फायद्यात सुरू असलेली एअर इंडिया एक्सप्रेसला जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहाने विकत घेतले आहे. आकडेवारीनुसार, एअर इंडियाचे कर्ज 26,879.6 कोटी रुपये होते. तर इंडिगोचे कर्ज 67,088.4 कोटी रुपये होते. एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाईस जेटचे कर्ज अनुक्रमे 617.5 कोटी रुपये, 78.5 कोटी रुपये आणि 886 कोटी रुपये होते.