पुण्यातील रस्त्यावर पुन्हा रक्ताचा सडा, भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून संपवले

शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खुनानंतर पुण्यात गँगवार भडकले आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. आयुष कोमकर, गणेश काळे याच्या खुनानंतर मंगळवारी भरदुपारी अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर वार करून त्याचा खून केला. भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरही वार करून गंभीररीत्या जखमी केले आहे.

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप गार्डनजवळ ही घटना मंगळवारी दुपारी सवातीनच्या सुमारास घडली. मयंक सोमदत्त खरारे (17) असे ठार झालेल्या अल्पवयीनाचे नाव आहे. अभिजित संतोष इंगळे (18) असे गंभीररीत्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांची पाच पथके रवाना केली आहेत. खुनाचे नेमके कारण अजून समजू शकले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त हृषिकेश रावले यांनी दिली आहे.