पोर्शे कार अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पब, बारसह 21 वर्षांखालील तरुणांना दारू न देण्याबाबतचे नियम कडक केले असलेतरी अनेक बारचालक ते गांभीयनि घेत नसल्याचे समोर आले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीनांना दारू पुरविल्याप्रकरणी तीन आस्थापनांवर कारवाई केली.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क विभागाने 32 हुन अधिक पब, बारवर कारवाई करून त्यांचे व्यवहार बंद केले. तसेच शहरासह जिल्ह्यात तपासणी मोहीम राबवून कारवाईचा सपाटा लावला होता. मात्र, घटना घडल्यानंतर कारवाईचा वेग वाढविणारे उत्पादन शुल्क विभागाचे पथक इतरवेळी शांत दिसते त्यामुळेच नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नाही. 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला परमिट रूम, बिअर बारमध्ये मद्यसेवन करता येणार नाही. तसेच 21 ते 25 पर्यंत व्यक्तींना सौम्य मद्यसेवन करता येते. दारू पिण्यासाठी मद्यसेवन परवान्याचीही आवश्यकता असते. मात्र, क्वचितच काही ठिकाणी परवान्याची विचारपूस केली जाते. बारमध्ये मद्यसेवन करण्यासाठी काही अटी व शर्ती असून, या मजकुराचा फलक बारमध्ये लावण्यास सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबतची खात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते. परंतु असे फलक आणि त्या फलकावरील सूचनांचे किती बारमध्ये पालन केले जाते, हा संशोधनाचा विषय बनला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून केवळ महिन्याच्या ठराविक तारखेला हद्दीतील बारना भेट देऊन पाहणी केली जात असल्याने सर्व काही आलबेल असल्याची चर्चा आहे.
एक्साईजची कारवाई काय?
पुणे उत्पादन शुल्क विभागाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात शहरासह जिल्ह्यातील आस्थापनांची तपासणी करून विविध नियमभंगप्रकरणी 77 आस्थापनांवर कारवाई केली, तर अल्पवयीनांना दारू दिल्याप्रकरणी 3 आस्थापनांवर कारवाई करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
अनधिकृत ढाबे, तळीरामांचे अड्डे
जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत धाबे थाटण्यात आले आहेत. त्या ठिकाणी वाईन शॉपवरून मद्य आणून तळीराम बसतात. मात्र, अशा बेकायदेशीर धाब्यांवर एक्साईजकडून गेल्या काही दिवसांत ठोस कारवाई झालेली नाही.