माता न तू वैरिणी… निर्दयी आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माता न तू वैरिणीचा प्रत्यय मीरा रोडमध्ये आला आहे. निर्दयी आईने पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पेणकरपाडा येथील वर्तक गल्लीतील स्थानिकांना हे अर्भक दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

मीरा रोड पूर्वीतील पेणकरपाडा येथील वर्तक गल्लीत एक ३ ते ४ महिन्यांचे मृत अर्भक सापडल्याची माहिती समाजसेवक सोमनाथ पवार यांनी काशिमीरा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भक ताब्यात घेतले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या अपत्याचा जन्म लपवण्याच्या उद्देशाने मृत अर्भक उघड्यावर फेकून त्याची विल्हेवाट लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बुहऱ्हाडे करत आहेत.