
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत याबाबत विधान केले होते.
प्रफुल्ल पटेल यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे अजित पवार गटाची स्पष्टीकरण देताना तारांबळ उडाली. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा पियुष गोयल यांचा दावा अजित पवार गटाने फेटाळून लावला. यानंतर पियुष गोयल यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.
“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या माहितीची शहानिशा न करता मी प्रसारमाध्यमांमध्ये काही विधाने केली होती. मात्र, नंतर ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करत आहे. या दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे.
एक वरिष्ठ पत्रकार ने मुझे गलत जानकारी दी थी कि श्री प्रफुल पटेल राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष चुने गए हैं। जानकारी की पुष्टि किये बिना मैंने मीडिया में कुछ बयान दिया था किंतु बाद में पता चला जानकारी गलत है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजीतदादा…
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 1, 2026
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री
दरम्यान, बारामती येथे बुधवारी 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु अजित पवार यांच्याकडे असणारे राष्ट्रीय अध्यक्षपद, पुणे-बीडचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत तर्कवितर्कंना उधाण आलेले आहे.

























































