
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने शुक्रवारी अमेरिकेचे एफ 15 E लढाऊ विमान पाडले होते. या घटनेनंतर एक अमेरिकन पायलट इराणच्या हद्दीत बेपत्ता झाला होता. या पायटलला सुखरूप वाचवण्यात अमेरिकन लष्कराला यश आले आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, हा वैमानिक आता इराणच्या सीमेबाहेर सुरक्षित स्थळी पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इरानणे अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराने वैमानिकांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. या शोधमोहिमेत एका वैमानिकाला तातडीने वाचवण्यात आले होते, मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी दोन दिवस थरार सुरू होता. मात्र अखेर दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अमेरिकन लष्कराला दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्यात यश आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर “आम्ही वैमानिकाला सुखरूप परत आणले आहे” असे लिहित या त्यांच्या शोध मोहिमेच्या यशाला दुजोरा दिला.
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, हा बचाव कार्याचा प्रयत्न अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक होता. बेपत्ता वैमानिक दोन दिवस इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात शत्रूपासून स्वतःचा बचाव करत लपून बसला होता. त्याच्यावर 24 तास पाळत ठेवण्यात आली होती. अमेरिकन लष्कराने या मोहिमेसाठी काही आधुनिक विमाने आणि शस्त्रे तैनात केली होती. बचाव कार्य सुरू असताना इराणच्या सैन्यासोबत अमेरिकन जवानांची मोठी चकमकही झाली. या मोहिमेत वैमानिक किरकोळ जखमी झाला असला तरी त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
अमेरिकन लष्कराच्या या यशस्वी मोहिमेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराणने जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) तातडीने खुली करावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी इराणला पुढील 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून, मागणी पूर्ण न झाल्यास मोठी लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या या इशाऱ्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. जर अमेरिकेने इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला, तर नरकाचे दरवाजे उघडले जातील, अशी चेतावणी जनरल अली अब्दुल्लाही अलियाबादी यांनी दिली आहे. इराणने या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत किमान 13 अमेरिकन सैनिक मारले गेले असून 300हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
























































