‘ओला-सुका’ वर्गीकरणासाठी साताऱ्यात मोहिम, 7 ऑगस्टपर्यंत अभियान

जिह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओल्या-सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी पूर्ण जिह्यात दि. 7 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे. जिह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग ओला (हिरवा), सुका (निळा) या नावाने अभियान राबवले जाईल.

राज्यातील गावस्तरावर दि. 7 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबवले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र हगणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हगणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करण्यासाठी विविध विषयांच्या उपक्रमामार्फत गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात व सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

प्रत्येकाने नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पद्धतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लॅस्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, गावात येणाऱ्या छोट्या व्यावसायिक व्यक्तींनी उपलब्ध सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. याबाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटीदरम्यान शासनाच्या गुगल लिंकद्वारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. सातारा जिह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील गावांमध्ये गृहभेट उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवकामार्फत संवादकांची नेमणूक करून गृहभेटीचे आयोजन करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी केले आहे.

मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करून अंमलबजावणी करावी. दर आठवड्याला या अभियानाचा जिल्हास्तरावरून आढावा घेण्यात येणार आहे. दि. 7 ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणाऱ्या ओला व सुका कचरा व्यवस्थापन मोहिमेत ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

प्रत्येक गावात पाच संवादक

प्रत्येक गावात 5 संवादकांची निवड करण्यात येणार असून, हे संवादक प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वच्छतेचे संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.