मिटमिटा दंगलीची पोलीस महासंचालकांनी केली चौकशी

56

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

निवृत्तीला केवळ दोनच दिवस उरले असल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी मिटमिटा दंगलप्रकरणी गुरुवारी चौकशी केली. यामध्ये मिटमिटावासीयांसह घाटीतील डॉक्टर, मनपाचे चालक आणि पोलिसांकडून त्यांनी माहिती घेतली. मात्र, पोलिसांनी एक हजाराहून जास्त नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मिटमिटावासीयांच्या मागणीला त्यांनी बगल दिली. चौकशीनंतर त्यांनी आपण लवकरच गृह विभागाकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले असले तरी दोन दिवसांनंतर ते निवृत्त होत असल्याने ही चौकशी फार्स ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिटमिटा येथे कचरा टाकण्याचा कारणावरून उद्रेक झाला होता. यावेळी परिसरातील रहिवासी आणि पोलीस आमनेसामने भिडले होते. या प्रकरणी पोलिसांनी साडेबाराशे जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, मिटमिटा दंगलप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेत परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्याचा कारणावरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते. या घडामोडीनंतर सरकारने मिटमिटा दंगलप्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. पोलीस महासंचालकांनी तात्काळ चौकशी सुरू न करता आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे निवृत्तीपूर्वी ते सरकारकडे अहवाल देणार का, यातून मिटमिटावासीयांना न्याय मिळणार का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मनपाने मिटमिट्यातील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने रहिवाशांनी त्याला विरोध केला. ७ मार्च रोजी मिटमिटा भागात पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेच्या गाड्या कचरा टाकण्यासाठी आल्या. तेव्हा संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्या आडवत विरोध दर्शवला होता. पोलीस बळाचा वापर करीत असल्याने प्रत्युत्तरात रहिवाशांनी दगडफेक सुरू केली होती. उद्भवलेली परिस्थिती पोलिसांनी संयमाने हाताळायला हवी होती, पण तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करीत लाठामार सुरू केला. त्यामुळे पोलिसांविरुद्ध मिटमिटा रहिवासी अशी दगडफेक सुरू झाली. मात्र, एकंदरीत हा प्रकार पाहताच मिटमिटा रहिवासी आपापल्या घरात गेले होते; परंतु पोलिसांनी रहिवाशांना घरातून बाहेर काढत त्यांच्यावर लाठीमार केला होता. घरात घुसून घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान केले. पोलिसांनीदेखील रहिवाशांच्या घरांवर तुफान दगडफेक केल्याचे सीसीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे. तसे पंचनामेदेखील तपास पथकाने नोंदवले आहेत. ही समिती याची किती दखल घेणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

मिटमिटा रहिवाशांची संख्या साडेआठशे आहे. मात्र, पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह दगडफेक असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सुमारे बाराशे रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महासंचालक माथुर यांनी घाटीतील डॉक्टरांसह मनपाच्या गाडीवरील चालकांसह जमावावर दगडफेक आणि लाठीमार केलेल्या पोलिसांची देखील चौकशी करीत घटनेची माहिती घेतली. दगडफेकीच्या चौकशीचा अहवाल करणाऱ्या उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे आज गुरुवारी झालेल्या चौकशीचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या