मोठी बातमी: आमदार अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच चालणार; सप्टेंबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता, वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती

सर्वोच्च न्यायालयात आज सरन्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयातच चालेल, असे स्पष्ट संकेत सरन्यायाधीशांनी दिल्याचं सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत. विविध वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

‘दोन्ही बाजूंनी Compilation (संकलन) द्यावं. सुनावणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुनावणी नक्की होणार याचा निकाल देखील अपेक्षित आहे’, असं शिंदे म्हणाले. एक-दोन दिवसात पुढची तारीख मिळेल. सप्टेंबर मध्ये मात्र प्रकरण ऐकून निकालात काढले जातील असा विश्वास सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात बोलताना वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जयंत पाटील यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. 29 जुलै रोजी अजित पवारांना चार आठवड्यात उत्तर देण्याची मूदत देण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना तीन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. म्हणजे त्याचीही प्रक्रिया आता सुरू झाली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी आज झाली नसली तरी आता सप्टेंबर महिन्यात ही सुनावणी होईल आणि निकालीही लागेल, अशी शक्यता शिंदे यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, न्यायालयाने मागील सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र का करू नये, असा सवाल करत त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे मिंधे गटाचेही चांगलेच धाबे दणाणले असून त्यांचे काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतर्फे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांची सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यामुळे सुनावणी लक्षवेधी ठरली आहे.