सत्तेचा लाभ उठवण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट, आमदार उत्तम जानकरांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व गेल्यावर सत्तेचा लाभ उठविण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट वाढत आहे. प्रत्येक बगलबच्चाला वाटते, सत्तेसाठी माझे चालावे, असा हल्ला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी अजितदादा गटाच्या नेत्यांवर चढवला.

दोन राष्ट्रवादीच्या एकत्री- करणाच्या चर्चा सुरू होत्या. पण आता अजितदादाच नाहीत, शरद पवार यांचा विचार हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा आहे. तर अजितदादा ज्यांच्यासोबत गेले त्यांचा विचार गुलामगिरीचा असल्याची टीका आमदार जानकर यांनी केली.

आधी विचारधारेचा निर्णय होऊ द्या

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणापूर्वी आधी विचारधारा एकत्र येणे गरजेचे आहे. एनडीएसोबत जायचं की नाही हा निर्णय फक्त शरद पवार हेच महाराष्ट्र हिताचा विचार करून घेऊ शकतील. आधी विचारधारेचा निर्णय होऊ द्या, राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा नंतरचा विषय आहे, असे उत्तम जानकर म्हणाले.