विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे महायुतीला फायदा झाला होता. सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा काँग्रेसचा आरोप होता. त्यातील दोन आमदारांवर आज कारवाई झाली. झिशान सिद्दिकी आणि जितेश अंतापूरकर या दोन आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. ही पक्षाची कारवाई आहे असे त्यांनी सांगितले. क्रॉस व्होटिंगमधील संशयित आमदारांची नावे पक्षश्रेष्ठींना कळवली होती. त्यानुसार पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार होता, आता जे काँग्रेसमध्ये नाहीत त्यांचा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही, असे सांगत पटोले यांनी यासंदर्भात अधिक बोलण्यास नकार दिला.
झिशान सिद्दिकी यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसशी दुरावा वाढला होता आणि अजित पवार यांच्याबरोबर जवळीक वाढली होती तर जितेश अंतापूरकर हे भाजपवासी झालेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जातात. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर अंतापूरकर यांनी आज सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.