मुख्यमंत्र्यांसाठी धो धो पावसात डांबरीकरण; मीरा-भाईंदर पालिका, एमएमआरडीएचा कारनामा

फडणवीस यांच्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका आणि एमएमआरडीएने भरपावसात डांबरीकरण करण्याचा कारनामा केला आहे. मुख्यमंत्री आज एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी या दोन्ही प्राधिकरणांची यंत्रणा आज सकाळपासून कामाला लागली होती. डांबर टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवले जात होते. विशेष म्हणजे आज शहरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे बुजवलेल्या खड्ड्यातील डांबर वाहून गेले आहे.

मीरा-भाईंदर शहरातील विविध रस्त्यांवर सध्या खड्यांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पावसाळ्याचे कारण पुढे केले जात आहे. पावसाळ्यात रस्त्यावर डांबर टाकले जात नाही. कारण पाऊस पडल्यामुळे त्याचा चिवटपणा निघून जातो आणि ते खडीतून वेगळे होते. मात्र आज चक्क भरपावसात दोन्ही प्राधिकरणांनी मुख्यमंत्री ज्या मार्गाने शहरात आले त्या रस्त्यावर डांबरीकरण केले. युद्धपातळीवर सुरू असलेले हे काम पाहून नागरिकांनी अक्षरशः तोंडात बोटे घातली. पालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यपद्धतीवर सर्वच स्तरातून आता टीकेची झोड उठली आहे.

मुख्यमंत्र्यांना गल्लीबोळात फिरवा
मुख्यमंत्र्यांसाठी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठीही अशाच पद्धतीने काम करावे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मीरा-भाईंदरच्या गल्लीबोळातून थेट ठाणे, पालघरपर्यंत फिरवा म्हणजे कदाचित रस्त्यावरील पडलेले खड्डे भरून निघतील आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी कोपरखळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी मारली आहे.