राज ठाकरेंसोबत भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन काम करण्यावरून आमच्यात सहमती – संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम पद्धतीचा संवाद सुरू आहे अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन काम करण्यावरून आमच्यात सहमती झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम पद्धतीचा संवाद सुरू आहे. हा शिवसेनेचा दसरा मेळावा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुड पाडव्याला होतो, अशी आतापर्यंतची माझी माहिती आहे. दोन स्वतंत्र पक्ष आहेत. मराठी माणसा संदर्भात एक विचारसरणी असली तरी, दोन स्वतंत्र पक्ष आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेने दसऱ्यालाच होतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतंच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुडीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. दोन्ही पक्षांचे मेळावे होतात. भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरून आमच्यामध्ये सहमती झालेली आहे. दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. गेल्या 60 वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो असेही संजय राऊत म्हणाले.

शिंदे सर्व प्रकारच्या इनिंग मधून बाहेर पडलेले आहेत. आता या महाराष्ट्रामध्ये जी काही इनिंग वगैरे का सुरू आहे ती देवेंद्र फडणवीस यांची सुरू झालेली आहे. आणि फडणवीस नाईट वॉचमन म्हणून येतात आणि आऊटच होत नाही हे शिंदेना कळायला पाहिजे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.