सायबर सुरक्षा – धोक्याच्या वळणावर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैशाली मंडपे

नुकतीच गाझियाबादमधील तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना कोरियन लव्हर गेमया टास्कआधारित ऑनलाइन गेमशी जोडली जात आहे. मोबाईलने अनेक अर्थांनी आपले जग व्यापले असले तरी मोबाईल गेमिंगचे जग या पिढीसाठी धोक्याचे संकेत देणारे ठरत आहे.

मुलांमधील गेमिंग अॅडिक्शन किती भयानक वळणावर येऊन पोहोचली आहे हे नुकत्याच झालेल्या गाझियाबादमधील घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले. ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज सारख्या गेम्सनी काही वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता. यात दिले जाणारे टास्क जीवघेणे ठरले. अनेक अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्यानंतर या गेमबाबत पालक काही अंशी जागरुक झाले. आता किशोरवयीन मुलांमध्ये सध्या पॉप्युलर असलेल्या ‘कोरियन लव्हर गेम’मधील धोका या घटनेमुळे समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील अल्पवयीन तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना ‘कोरियन लव्हर गेम’ या टास्क-आधारित ऑनलाइन गेमशी जोडली जात आहे. या गेमच्या अंतिम टास्कमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. मध्यरात्री  सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून बहिणींनी बाल्कनीतून उडी घेतली. त्यांच्या खोलीमधून जी सुसाईड नोट मिळाली, ज्यात लिहिले होते, ‘मम्मी पापा सॉरी… आता कळेल तुम्हाला आमचे कोरियावर किती प्रेम आहे. कोरियन लव्ह.’

या तीनही बहिणी गेली काही वर्षे एक ऑनलाइन कोरियन गेम खेळत होत्या. या गेमच्या स्ट्रटेजीनुसार त्या स्वतला कोरियन राजकन्या समजत होत्या आणि गेममध्ये दिलेले टास्क पूर्ण करत होत्या. या गेममधील 50 टास्कपैकी शेवटचा टास्क हा होता. मुलींमधील गेमचे अॅडिक्शन इतकं वाढलं होतं की मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. तिघींपैकी मधली बहीण गेममध्ये ‘बॉस’ किंवा लीडर होती, जी इतर दोघींना सूचना देत असे.

कोरियन लव्हर गेम कोरियन संस्कृती, के-पॉप आणि के-ड्रामावर आधारित रोमँटिक टास्क-बेस्ड ऑनलाइन गेम आहे. यामध्ये खेळाडूला व्हर्च्युअल कोरियन प्रेमी मिळतो, जो छान छान प्रेमाचे मेसेज पाठवतो आणि यासोबतच रोज टास्क देतो. सुरुवातीला मजेशीर वाटणारे टास्क लेव्हल जसजशी वाढत जाते तसे अधिक धोकादायक होत जातात. शेवटचा टास्क अनेकदा आत्महत्येशी जोडला जातो. या गेममुळे खेळाडू वास्तव जगाचे भान विसरून आणि आभासी खोट्या जगात हरवतात, स्वतला कोरियन समजू लागतात. गाझियाबाद प्रकरणात बहिणींनी गेममुळे कोरियाला जाण्याचा हट्ट केला होता. जो पालकांना आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे शक्य नव्हते. आपले आईवडील आपल्याला समजून घेत नाहीत अशी मुलींमध्ये ठाम भावना निर्माण झाली होती. दिवसेंदिवस त्यांच्यातील संवाद कमी होत गेला. खोलीत रडत असलेल्या चित्रांचे कार्टून, ‘आय एम वेरी अलोन’ असे मजकूर  सापडले. यावरून मुली भावनिकदृष्ट्या किती डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या हे समजते.

अनेकदा पालकांना मुलांमधील गेम अॅडिक्शन दिसत असते, परंतु सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मुलांच्या शाळा, अभ्यास याबाबत तक्रारी येतात तेव्हा पालक मुलांच्या मोबाईल वापरावरती बंदी घालतात. जे मुलांना आवडत नाही. टोकाचे मोबाईल अॅडिक्शन हे प्रत्येक वयोगटामध्ये दिसते.  सामाजिक पार्श्वभूमी कोणतीही असो, कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा मोबाईलच्या आभासी जगात रमलेला दिसतो. या संवाद हरवण्याचाच परिणाम म्हणजे आपलं मूल अभ्यासाव्यतरिक्त काय करत असतं याची पालकांना जराही कल्पना नसते. अर्थात प्रत्येक वेळी पालकांना दोष देऊन पालकत्वावर शंका घेण योग्य नाही. पालकांचे स्वतचे अनेक संघर्ष सुरू असतात. नोकरी, त्यामुळे होणारे रोजचे थकवणारे प्रवास, कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या अशा अनेक समस्या पालकांसमोरही असतात याची मुलांना जाणीव नसते. मुलांचे हट्ट पुरवले जात असले तरी जेव्हा मुलं क्षमतेपेक्षा अधिक काही मागतात तेव्हा पालक हतबल होऊन नकार देतात. पण या वेळी मात्र हा नकार पचवण्याची मुलांची मानसिक क्षमता नसते. गाझियाबादमधील घटनेमध्ये दिसून येते की, कोरियाला जाण्याचा हट्ट पालकांना आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडणारा नव्हता. पालकांनी सुरुवातीला या हट्टाकडे दुर्लक्ष केले, परंतु मुलींना मात्र हा नकार पचवता आला नाही.

या घटनेने पुन्हा एकदा गेमिंगमधील धोक्याची जागरुकता आणि प्रतिबंध किती गरजेचा आहे हे जाणवते. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाची गंभीरता यामुळे अधोरेखित होते. मुलांना मोबाईल देण्यापूर्वी पालकांनी काही नियम बनवावेत. ज्यामध्ये क्रीन टाइम मर्यादित ठेवावा. अनलिमिटेड वायफायची सुविधा हीसुद्धा धोकादायक असते. पालकांनी अॅप्सवरील अनोळखी गेम्स काय आहेत हे समजून घ्यावे. धोकादायक इशारा असलेले गेम, धोकादायक कंटेंट ब्लॉक करा. याविषयी मुलांशी संवाद साधत या गेममधील धोका समजावून सांगा. अनेक शाळांमध्ये जेव्हा मी डिजिटल साक्षरतेविषयी बोलते तेव्हा बॅंक खात्यातून अचानक पैसे गेल्याचे, परंतु हे पैसे कुठे गेले हे आम्हाला समजले नाही, असे अनेक पालकांनी सांगितले. बरेचदा मुले काही गेम्स डाऊनलोड करतात, खेळतात आणि अनइन्स्टॉल करतात. त्यामुळे पालकांना हे गेम आपली मुलं मोबाईलमध्ये खेळत आहेत हे समजत नाही. अशा घटना वारंवार घडत असतील तर पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता एखाद्या तज्ञ व्यक्तीशी संपर्क साधून यामागील कारण शोधावे. ही फक्त आर्थिक फसवणूक नाही, तर मुलांमध्ये हे गेमचे अॅडिक्शन अत्यंत धोकादायक ठरू शकते.

गाझियाबादमधील ही घटना सर्व पालकांसाठी इशारा आहे की, आभासी जगाच्या जाळ्यात अडकू नका. मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा अशा दुर्दैवी घटना राहतील.

[email protected]

(लेखिका सायबर प्रशिक्षक आहेत.)