मोबाईल नेटवर्क नसल्याने परीक्षा थेट मचाणावर!

संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावामध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा येत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी निपुण भारतची परीक्षा देण्यापासून वंचित राहत होती. ही बाब केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट मुलांची परीक्षा झाडावरील मचाणावर घेऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद फुलवला.

 दत्ताराम गोताड यांच्या या कृतीची दखल थेट पुण्यातील स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी घेतली व त्यांचे अभिनंदन केले. नारडुवे सडेवाडी शाळेत मोबाईलला नेटवर्क नाही व निपुण भारत ही परीक्षा दुसऱया गावात जाऊन देण्यासाठी, गावाबाहेर मुलांना पाठवायला पालक तयार नाहीत. यावर गोताड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सदानंद जोगळे नावाच्या विद्यार्थ्याने भीत भीत विचारले, साहेब, तुम्हाला झाडावर चढता येते का? 55 वर्षांच्या केंद्रप्रमुखांनी पटकन हो म्हटलं. विद्यार्थी म्हणाला, मग साहेब सोप्पं आहे. डोंगरात एका ठिकाणी झाडावर मचाण बांधलेली आहे. त्या मचाणावर मोबाईलला रेंज येते. तिथे कॉलेजची मुलं बसतात. लगेच केंद्रप्रमुख व सात विद्यार्थ्यांना घेऊन पायपीट करून मचाणापर्यंत पोहचले. तेथेच निपुण भारतची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली व विद्यार्थी यशस्वी झाले. मचाणावर पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा केंद्रप्रमुख यांनी सदानंद जोगळे याची सर्वप्रथम परीक्षा घेतली व त्याने सर्व स्तर प्राप्त केले. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाल्याने 55 वर्षांमध्ये आलेला सर्वोत्तम अनुभव असल्याचे केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड सांगितले.