मोदींची टीका – ईव्हीएमने विरोधकांची तोंडे बंद केली

‘अब की बार मोदी सरकार’चा जप भाजपने बंद केला आहे. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या आजच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी 72 मिनिटे मॅरेथॉन भाषण दिले. त्यात घटक पक्ष आणि एनडीएच्या नावाचा जप त्यांनी लावला. तब्बल 19 वेळा एनडीएचा आणि 13 वेळा भारत शब्दाचा उल्लेख त्यांनी केला. जनतेने हिसका दाखवत भाजपला 240 पर्यंत खाली आणले तरी जनतेचा कौल आम्हालाच असल्याचे सांगत मोदींनी इंडिया आघाडीच्या नावाने बोटे मोडली. निकालानंतर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघेल असे वाटत होते, पण त्या ईव्हीएमने विरोधकांची तोंडे बंद केली, अशी टीका मोदींनी केली.

मोदींना संविधान आणि लोकशाहीची आठवण झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येताच ते प्रथम संविधानापुढे नतमस्तक झाले. त्यांच्या भाषणात लोकशाहीचा गौरव पाहायला मिळाला. हिंदुस्थान मदर ऑफ डेमॉक्रसी आहे, असा डंका मी जगभरता वाजवतो आहे आणि विरोधक मात्र येथे डेमॉक्रसी नसल्याच्या वावडय़ा उठवत आहेत. हे खरे असते तर एक चहा विकणारा या पदावर बसू शकला असता का? विरोधक काहीतरी गल्लत करत आहेत, असे मोदी म्हणाले.

4 जूनला निकाल लागत असताना मी माझ्या कामांत व्यस्त होतो. मला पह्न येत होते. तेव्हा मी म्हटले, ईव्हीएम जिवंत आहे की मेलेय? लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे असेच जणू या लोकांनी ठरवून टाकले होते. निकालानंतर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघते की काय असे वाटले होते; पण ईव्हीएमनेच विरोधकांची तोंडे बंद केली. निवडणूक आयोग, लोकशाहीची ताकद त्या दिवशी सगळय़ांना कळली, असा टीकेचा सूर मोदींनी काढला.

दहा वर्षांनंतरही काँग्रेसला 100चा आकडा गाठता आलेला नाही. 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या जागांची बेरीज केली तर त्यापेक्षा जागा आम्हाला या निवडणुकीत मिळाल्यात, असे म्हणत मोदींनी आपली पाठ थोपटून घेतली.

जनतेचा कौल आम्हालाच असल्याचा मोदींचा दावा…19 वेळा एनडीए आणि 13 वेळा भारत शब्दाचा जप

देश चालवण्यासाठी सर्वांचे मत लागते
सरकार चालवण्यासाठी बहुमत असावे लागते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तसे बहुमत मिळाले आहे. मात्र देश चालवण्यासाठी फक्त बहुमत नाही, तर सर्वांचं मत महत्त्वाचं आहे, असा मोदींचा बदललेला सूर या भाषणात पाहायला मिळाला. सभागृहात कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असला तरी माझ्यासाठी सगळे समान आहेत, असेही ते म्हणाले.

मुहूर्त ठरला, रविवारी घेणार शपथ
मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला. आघाडीतील घटकपक्षांनी आपले पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले. त्यानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्तास्थापनेसाठी पाचारण केले असून मोदी रविवार 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.