इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर मोइन अलीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याची इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. मात्र तो देशांतर्गत लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.
मोईन अलीने डेली मेल या इंग्रज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तो म्हणाला की, मी आता 37 वर्षांचा आहे आणि या महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी माझी निवड करण्यात आलेली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. मला सांगण्यात आले होते की, आता पुढच्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मला वाटलं निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी माझे काम केले आहे, असे म्हणतं मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
मोईन अलीने इंग्लंडकडून 2014 साली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने इंग्लंडकडून 68 कसोटी, 138 वनडे आणि 92 टी20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर मोईन अली 2019 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2022 चा टी20 वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडच्या संघाचा भाग होता. त्याने इंग्लंडकडून सर्व फॉरमॅटमध्ये एकून 6678 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 8 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 366 विकेट घेतल्या आहेत. मोईन अलीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला होता.