पंजाबच्या मोहालीमधील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी; सीबीएसई परीक्षेच्या दिवशीच पालकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील मोहाली येथील प्रसिद्ध ज्ञान ज्योती शाळेसह इतर अनेक शाळांना आज पुन्हा एकदा ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे. गेल्या बुधवारी मोहालीतील 16 शाळांना अशाच प्रकारची धमकी मिळाली असतानाच, आज पुन्हा हा प्रकार घडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या धमकीच्या ईमेलनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना सुटी देऊन घरी पाठवले आहे. अनेक शाळांना अशा स्वरूपाचे धमकीचे संदेश प्राप्त झाले असून, या प्रकरणाची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून, पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शाळा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर चिंतेत पडलेले पालक आपल्या मुलांना नेण्यासाठी शाळेबाहेर गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, आज सीबीएसई बोर्डाची गणिताची पहिली परीक्षा असल्याने प्रशासनासमोर हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रांवर कडक सुरक्षा आणि तपासणी करून परीक्षा सुरळीत पार पाडणे हे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलीस या धमकीच्या ईमेलचा नेमका कोणी केलाक शोधण्यासाठी सायबर विभागाची मदत घेत असून परिसराची कसून तपासणी केली जात आहे.