CAA, NRC – हिंदुस्थानच्या एका निर्णयामुळे मलेशिया अडचणीत

1609

हिंदुस्थानच्या एका निर्णयामुळे मलेशिया संकटात सापडला असून त्यांना भयंकर आर्थिक नुकसान सहन करायला लागते आहे. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. महातीर यांनी कश्मीरमधून कलम 370 हटविणे, नागरिकत्व सुधारणा कायदा CAA आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजेच NRC याला सातत्याने विरोध केला होता. त्यांच्या या विरोधी सुरामुळे हिंदुस्थानने त्यांच्याकडून पामतेलाची आयात बंद केली आहे. असं असलं तरी महातीर यांनी आपला विरोध मावळमार नसून, नुकसान सहन करावं लागलं तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत अशी भूमिका घेतली आहे. चुकीच्या गोष्टींविरोधात मी बोलतच राहणार असं त्यांनी म्हटले आहे.

महातीर यांनी सौदी अरेबिया आणि हिंदुस्थानवर जबरदस्त टीका केली होती. जम्मू कश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याच्या निर्णयावरून महातीर यांनी बरीच आगपाखड केली होती. कलम 370 हटवून हिंदुस्थानने कश्मीरवर हल्ला करून तो भाग आपल्या ताब्यात ठेवण्याची धडपड केली असल्याची बेताल विधाने महातीर यांनी केली होती.

हिंदुस्थानात पामतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात होत असते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यापासून हिंदुस्थानातील व्यापाऱ्यांनी पाम तेल आयात करणे बंद केलं आहे. इंडोनेशियानंतर पामतेलाच्या आयातीमध्ये मलेशियाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हिंदुस्थानने आयात बंद केल्याने मलेशियातील पाम तेल रिफायनरीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या समस्येवर आपण काहीतरी तोडगा काढू असा विश्वास महातीर यांनी व्यक्त केला आहे.

महातीर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की ‘हिंदुस्थान हा पाम तेलाचा मोठा खरेदीदार  देश असल्याने आमच्यापुढे ही मोठी समस्या आहे. मात्र दुसरीकडे जे चुकीचे आहे तर त्याबाबत आम्हाला स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. फायद्याकडे पाहून जर चुकीच्या गोष्टी होऊ दिल्या आणि त्याबद्दल काही बोललो नाही तर गोष्टी चुकीच्या दिशेने जातील. आम्हीही चुकीच्या गोष्टी करायला लागू आणि इतरांनाही सहन करत राहू ‘

आपली प्रतिक्रिया द्या