हिंदुस्थानी संघाचा मातब्बर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तो बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा एक मोठा हादरा मानला जात आहे.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. उभय संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. WTC Final च्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही लढत महत्वाची ठरणार आहे. मात्र या मालिकेतून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बाहेर होण्याची शक्यता आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतीम सामन्यानंतर मोहम्मद शमी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याच्या पायावर शस्त्रक्रीय करण्यात आली होती. तेव्हापासून तो क्रिकेट पासून लांब आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शमीने प्रॅक्टीसला सुरुवात केली होती. तसेच तो चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा करत होता. मात्र बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) सरावा दरमन्यान त्याचा गुडघ्याला पुन्हा एकदा सुज आली. त्यामुळे शमीला आता पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागण्याची शक्यता आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शमी बाहेर होण्याची शक्यता आहे.