कंटाळा आला तरच निवृत्ती, मोहम्मद शमीचा आक्रमक सूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या दिवशी क्रिकेटचा कंटाळा येईल त्याच दिवशी निवृत्ती घेईन, अशा आक्रमक सुरात हिंदुस्थानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपली भूमिका व्यक्त निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सध्या तरी मी पूर्णपणे फिट, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि खेळाचा आनंद घेत असल्याने निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही शमीने आवर्जून सांगितले.

गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थानी संघाबाहेर असतानाही शमीने हार मानलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून तब्बल 67 विकेट घेत त्याने आपली धार अजून कायम असल्याचे दाखवून दिले होते, मात्र या दमदार कामगिरीनंतरही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही.  स्वतःची निवड करणे माझ्या हातात नाही, पण कामगिरी माझ्या हातात आहे. माझं काम म्हणजे मैदानात उत्तर देणं आणि मी ते देतोय, असेही शमी रोखठोक अंदाजात म्हणाला.

मानसिकदृष्टय़ा अजूनही भक्कम असल्याचे सांगताना शमी म्हणाला, ज्या क्षणी खेळाडू निवृत्तीचा विचार करतो, तो थकलेला असतो. पण मी अजून थकलो नाही. ज्या दिवशी खेळात मजा वाटणार नाही, त्या दिवशीच मी क्रिकेटला अलविदा म्हणेन. शमीच्या या वक्तव्यातून आणि देहबोलीतून त्याची जिद्द आणि आक्रमकता स्पष्ट दिसून येते.

दरम्यान, आयपीएलमध्ये शमी आता लखनऊ सुपर जायंट्सकडून नवा अध्याय सुरू करत आहे. संघाने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्याचा निर्धार आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, शमी अजून संपलेला नाही, तो अधिक आक्रमकपणे परतण्यासाठी सज्ज झाला आहे.