बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले आणि अत्याचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. काहीही कारण नसताना बांगलादेशातील हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे तिथे कुणावरही अन्याय आणि अत्याचार होऊ नये ही आपल्या देशाची जबाबदारी असल्याचे मोहन भागवत म्हणाले.
देशात आज 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आरएसएसच्या मुख्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संबोधन केले. स्वातंत्र्याच्या मूल्यांचे रक्षण करणं ही पुढच्या पिढीची जबाबदारी आहे. दुसऱ्या देशावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न काही देशांकडून सतत केला जातोय. अशा परिस्थिती आपण सतर्क आणि सावध राहून त्यापासून वाचणं गरजेचं आहे. परिस्थिती कायम बदलत असते. कधी-कधी चांगली असते तर कधी-कधी बिघडलेली असते. असे चढ-उतार येतच असतात, असे मोहन भागवत म्हणाले.
आपण एक परिस्थिती पाहतोय. आपल्या शेजारी देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे आणि तिथे राहणाऱ्या हिंदूंना काहीही कारण नसताना हिंसेचा सामना करावा लागत आहे. दुसऱ्याला मदत करण्याची हिंदुस्थानची परंपरा आहे. हिंदुस्थानने कुणावरही हल्ला केलेला नाही, मदतच केली आहे. आपला देश सुरक्षित राहील आणि त्यासोबतच आपल्याला इतर देशांनाही मदत करावी लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.