
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस होऊन चारा आणि धान्य मुबलक होईल, तसेच देशासमोरचा तिढा सोडविण्यासाठी सर्वांशी विचार विनिमय केला जाईल. त्यासाठी आवश्यक प्रमुखांच्या बैठका होतील आणि त्यातून घेतलेल्या निर्णयाप्रमाणे धाडसाने यावर मात करून अखेर विजय पताका फडकेल, अशी भाकणूक मोहोळच्या ग्रामदैवत नागनाथ यात्रेतील खर्गाच्या दिवशी झाली.
राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहोळच्या यात्रेत खर्ग म्हणजे पहाटेचा कार्यक्रम आणि नंतर तीन दिवसांनी गण म्हणजे दुपारचा कार्यक्रम होत असतो. या दिवशी उत्तर दिशेला असलेल्या दिल्ली दरवाजामध्ये होणाऱ्या भाकणुकीकडे राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले असते. नुकत्याच झालेला पहलगाम हल्ला आणि त्यामुळे देशासमोर उद्भवलेला पेचप्रसंग या पार्श्वभूमीवर खर्गाची भाकणूक नेमकी काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नागनाथ ज्यांना भेट देण्यासाठी येतात, असे हैग्रस वंशज विनायकराव तथा अरुण मोहोळकर यांनी या भाकणुकीचा अर्थ सांगितला. सुरुवातीला पहाटे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर विनायकराव यांनी काही वेळाने साखर खर्गे महाराजांच्या तोंडात भरवल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये भगवान शंकरांचा संचार होतो आणि देवळातून बाहेर पडल्यानंतर दिल्ली दरवाजात ही भाकणूक होते. त्यानंतर अभंग, साकी म्हणत पालखी आणि खर्गे महाराज मिरवणुकीने खर्गतीर्थाकडे जातात. खर्गतीर्थामध्ये पाण्यातच ही गुरू-शिष्यांची गळाभेट होते. तिथेच पावसाची भाकणूक होते. त्यानुसार यंदा समाधानकारक पाऊस होईल. त्यामुळे धान्य आणि चाऱ्याचे मुबलक प्रमाणात उत्पादन होईल.
त्यानंतर ओढ्यामध्ये पेरणीची भाकणूक होते. त्यानंतर काकडे पार येथे मोहोळ शहर परिसराची भाकणूक होते. त्यानंतर मुंगी धोंडा येथे चाऱ्याची भाकणूक होते. त्यानंतर आलेल्या मार्गाने परत पालखीसह खर्गे महाराजांची सवाद्य मिरवणूक देवळापर्यंत येते. त्या ठिकाणी शेटेच्या वाड्यासमोर धान्याची भाकणूक होते. तिथून देव परत देवळात प्रवेश करतात आणि आरती होऊन प्रसाद वाटल्यानंतर जवळपास दोन तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता होते.
या कार्यक्रमाला 50 ते 60 हजार भाविकांनी हजेरी लावली होती. नागनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने यावर्षी नऊ ठिकाणी डिजिटल स्क्रीन उभारल्यामुळे भाकणूक आणि खर्गतीर्थातील भेट याचा थेट बघण्याचा आनंद भाविकांना घेता आला. प्रशासनाने भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या.