
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेत्यांच्या गाठीभेटीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळी माघार घेतली. यामुळे भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात निवडणूक सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महायुतीमध्ये बंडखोरी झाली असून भाजपविरोधात शिंदे गटाने आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
राष्ट्रवादीने तनपुरे यांना एबी फॉर्म दिल्याने ही निवडणूक भाजपला जड जाईल अशी चर्चा होती. दरम्यान, सकाळी 11 वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरे यांची भेट घेतली. त्यांनी तनपुरे यांच्याशी राहुरी नगर परिषद, साखर कारखाना, राहुरी औद्योगिक वसाहत, मुळा धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढण्याच्या प्रश्नावर बंद दाराआड चर्चा केली. यानंतर तनपुरे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले.




























































