
मोखाडा तालुक्यात जनावरांना फऱ्याचा फेरा आला असून दोन महिन्यांत ५० गुरे दगावली आहेत. ताप, तोंडाला फेस येऊन गुरांच्या गळ्याला आणि मांडीला सूज येण्याची लक्षणे वाढली आहेत. सदरचा आजार हे फऱ्या रोगाचे लक्षण असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कामधेनूंचा डोळ्यांसमोर तडफडून मृत्यू होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मोखाड्यातील सूर्यमाळ, किनिस्ते, जोगलवाडी सायदे, शेळकेवाडी, राजेवाडी या गावांसह परिसरातील इतर गावांतही मोठ्या प्रमाणात जनावरांना फऱ्या या साथीच्या रोगाने ग्रासले आहे. या आजारात जनावराच्या मांडीला, गळ्याला सूज येणे, तोंडाला आढळून येत आहेत. या गाव व परिसरात जानेवारी महिन्यात २५ जनावरे दगावली आहेत. त्यापूर्वी डिसेंबर महिन्यातही ‘साधारण तेवढ्याच जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाई, बैल व लहान वासरांचा समावेश आहे. सूर्यमाळ येथील पशुपालक शेतकरी अनिल मोरे यांच्या तीन गाई दोन दिवसांपूर्वी मृत्यू पावल्या आहेत. तर जोगलवाडी येथील प्रकाश उंबरसाडे, चंद्रकांत घाटाळ यांचे दोन बैल दगावले आहेत. किनिस्ते येथील दगडू जोशी, राघो वाघ, लक्ष्मण काळदिंडा, यांच्या प्रत्येकी दोन-दोन गाई दगावल्या आहेत. या गावातील मृत जनावरांचा आकडा मोठा आहे.
आश्वासन हवेतच
पालघर जिल्हा दुग्धविकास आयुक्त व पशुसंवर्धन दुग्धविकास सहआयुक्त मुंबई यांनी जोगलवाडी गावात नुकसानग्रस्त पशुपाल कांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही मदतीची फुटकी कवडीही मिळालेली नाही.
जनावरे दगावल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. त्याची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. मात्र जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. अनेक शेतकरी स्थलांतरित तसेच जनावरे मोकाट असल्याचे आढळल्याने तेथे लसीकरणाचे दोन राऊंड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– सतीशकुमार जाधव, सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास, दुग्ध व्यवसाय, मोखाडा




























































