कसोटीला अच्छे दिन आणण्यासाठी आयसीसीची मनी पॉवर

टी-20 क्रिकेटच्या झंझावाती खेळाने प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली होती; मात्र आयसीसीने ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप क्रिकेटपटूंना पुरेसे मानधन मिळत नसल्याने त्यांचा कल हा टी-20 क्रिकेटकडे अधिक झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने कसोटीत मनी पॉवर वाढवण्याची शक्कल लढवली असून, कसोटी क्रिकेटसाठी 150 लाख डॉलर्सचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कसोटी खेळणाऱ्यांचे मानधन वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

टी-20, टी-10 यासह अन्य झटपट क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटला उतरती कळा लागली होती. मात्र, क्रिकेटचा मूळ गाभा असलेल्या कसोटीला जिवंत ठेवण्यासाठी आयसीसीने कंबर कसली. कसोटी क्रिकेटला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आयसीसीने ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद ’सारखा अनोखा उपक्रम राबविला. हा उपक्रम यशस्वीदेखील झाला. ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’चा अंतिम सामना खेळण्यासाठी कसोटी संघांमध्ये चुरस पाहायला मिळू लागली. तसेच प्रेक्षेकदेखील पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळले.

मात्र, अद्याप क्रिकेटपटूंचे मानधन हा एक महत्त्वाचा मुद्दा उरला आहे. यावर तोडगा म्हणून कसोटी क्रिकेटसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरू केले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या या प्रस्तावावर हिंदुस्थान क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा आणि इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास खेळाडूंच्या मानधनात वाढ होईल. विदेश दौऱ्यावर संघ पाठवण्यासाठी लागणारा खर्चही यातून भागणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजसारख्या क्रिकेट बोर्डांना मदत मिळणार आहे.

कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा सध्या नऊ संघांना देण्यात आला आहे. भविष्यात यात वाढ होऊ शकते. वर्ल्डटेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं पर्व असून, अंतिम सामना हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने, तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला पराभूत केल होते. त्यामुळे तिसऱ्या पर्वात अंतिम फेरीत स्थान पक्के केल्यानंतर पराभवाचा वचपा काढण्याची संधी हिंदुस्थानकडे असणार आहे.