पाऊस देशभर फिरणार, मात्र महाराष्ट्राच्या वाटेला थोडावेळच येणार

सामना ऑनलाईन । पुणे

यंदा हिंदुस्थानात मान्सून सामान्यच राहणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने देशभरातील नागरिकांसाठी आनंदवार्ता मानली जात आहे, दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेलाही या बातमीने आनंद झाला होता. मात्र त्यांच्या आनंद मातीमोल करणारी एक नवी माहिती समोर आली आहे. साउथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरमने (SASCOF) वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षीही महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे.

नेपाळमधील काठमांडू येथे 18 ते 23 एप्रिल दरम्यान बैठकीनंतर SASCOFने मंगळवारी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये जून आणि सप्टेंबर दरम्यान हिंदुस्थानासह दक्षीण आशियात मान्सून सामान्यच राहणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषकरून कोकणात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचे या अंदाजात म्हटले आहे.