
पावसाची चातकासारखी वाट बघणाऱया आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदवार्ता आहे. मान्सूनने अंदमानात वर्दी दिली असून 6 जूनला मान्सून कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे. दरम्यान, आज राज्यात अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.