
मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कामगारांना बाजूला काढून नवीन कंत्राटी पद्धत राबवली जाणार आहे. चार विभागांत अशा प्रकारे काम सुरूही झाले आहे. याबाबत निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. यामुळे सफाई कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांना लाड-पागे शिफारशीनुसार मिळणारे सर्व सुविधा, हक्काच्या गोष्टी मारल्या जाणार आहेत. त्यामुळे नवीन कंत्राट पद्धतीची निविदा काढू नका, कामगारांचा बळी देऊन कुणाचा तरी खिसा भरू नका, अशी मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यासाठी आता सेवाधारित कंत्राटे राबवली जाणार असून त्यामुळे या खात्यातील कायमस्वरूपी कामगार असलेल्या मोटर लोडर तसेच इतर कामगारांना कंत्राटदाराच्या आदेशानुसार काम करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व कर्मचारी कामगार संघटनांनी याला विरोध करत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होणार नाही, कामगार कपात होणार नाही, त्याचे हक्क अबाधित राहतील, यावर सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी मांडून केली होती. त्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले, मात्र शिवसेनेने अशा प्रकारे नव्या कंत्राटांना विरोध करत अशा नवीन कंत्राट पद्धत राबवू नका, अशी जोरदार मागणी केली.
खर्चाची बचत होईल
लाड-पागे समितीच्या सवलती, सुविधा लागू राहतील. नव्या कंत्राटी पद्धतीमुळे दरदिवशी 42 लाख रुपये वाचणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मोटरलोडर आणि इतर कामगारांची कपात केली जाणार नाही, अन्याय होणार नाही, अशी माहिती सामंत यांनी दिली.
एका ‘मोठ्या’ माणसासाठी नको, पण कष्टकऱ्यांसाठी काही तरी करा!
मुंबईत बेरोजगारांच्या सेवा संस्था आहेत, महिला बचत गट, महिला मंडळे आहेत. जवळपास दीड-दोन हजार सहकारी संस्था आहेत. 500 च्या वर मजूर संस्था आहेत. महापालिकेत या संस्था छोटी-मोठी कामे करत आहेत. त्यांचा विचार या कंत्राटांसाठी करणार आहोत का नाही आपण? एका कंत्राटदाराचे कंत्राट 4 हजार कोटी ते 11 हजार कोटींपर्यंत जाणार आहे. मग आपण अशा एक मोठ्या कंत्राटदारांसाठी काम करणार आहोत की, जो कष्टकरी आहे त्यासाठी काही तरी करा, असे भावनिक आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले.