महाराष्ट्रभर पसरलेय ड्रग्जचे जाळे! पोलिसांसमोर हायड्रो गांजाचे आव्हान; सर्वाधिक आरोपी, छापे महाराष्ट्रात

मुंबई, वसईसह राज्यभर ड्रग्जचे जाळे पसरले आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या आणि परदेशातून चालवल्या जाणाऱ्या हायड्रो गांजाचे आव्हानही आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ड्रग्ज प्रकरणात सर्वाधिक छापे हे महाराष्ट्रात पडले असून सर्वाधिक आरोपीही महाराष्ट्रात सापडल्याबद्दल विरोधकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, अमली पदार्थांच्या प्रचार आणि प्रसाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रशिक्षित असे सुसज्ज युनिट तयार करण्यात आले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या वापराबद्दल, त्यांची खरेदी-विक्री शाळा आणि महाविद्यालये तसेच धार्मिक स्थळांजवळ होत असून याला आळा घालण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या याबद्दल भाई जगताप यांनी लक्षवेधी मांडली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला सविस्तर उत्तर दिले.

अँटिड्रग्ज क्लब तयार करणार 

अमली पदार्थांचे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे. बाजूच्या देशांमधूनही ड्रग्ज देशात येत आहेत. याला आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण सुरू असून शेजारी देशांबरोबर समन्वय साधला जात आहे. याला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला आळा घालण्यासाठी नागरिकांचे अँटिड्रग्ज क्लब तयार केले जाणार असून जनजागृतीवरही भर दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक 

औषधे, केमिकल्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियम तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पोस्टाबरोबर सर्व कुरिअरला नोटीस देण्यात आली आहे. प्रीस्क्रिप्शनशिवाय कफ सिरफ देऊ नये, मेडिकल स्टोअर्सवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

संभाजीनगरमध्ये कुरिअर, भंगाराआडून ड्रग्जचा वापर

ड्रग्जचा व्यापार फक्त मुंबई आणि वसईपुरता मर्यादित राहिलेला नाही तर लातूरमध्ये ड्रग्जमध्ये एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये भंगारच्या नावाखाली ड्रग्ज विकले जात आहे. त्याचबरोबर कुरिअरच्या माध्यमातूनही ड्रग्ज विकला जात आहे. प्रवासी गाडय़ांमधून याचा गुपचूप व्यापार होता. चालकालाही याची माहिती नसते. गाडी अपेक्षित स्थळी पोहोचण्याआधीच दोन-तीन किलोमीटर आधीच हे कुरिअर पार्सल काढून घेतले जाते. त्यानंतर ते महाविद्यालय, मुलांना वाटले जाते. त्यासाठी फॉर्मा आणि केमिकल्स कंपन्यांवर नजर ठेवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.