मुंबईतल्या शासकीय रुग्णालयांत एमआरआय-सीटी स्कॅन मशीनची कमतरता, विधानसभा अध्यक्षांची नाराजी

मुंबईतल्या सेंट जॉर्ज, जीटी, कामा आणि जे.जे. रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण येत येतात. पण या रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन्सची कमतरता आहे. दोन महिन्यांपासून मी या मशीन्ससाठी पाठपुरावा करीत आहे. पण आवश्यक मशीन्स देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज दिले.

वैद्यकीय शिक्षण विभागातील गैरव्यवहारावर शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांच्या नावाखाली बाजारभावापेक्षा अधिक दराने आवश्यकता नसताना वैद्यकीय उपकरणांची खरेदी होते. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचे संजय पोतनीस यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.

अधिकचा निधी उपलब्ध करणार – अजित पवार

एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनच्या संदर्भात माझ्या दालनात गेल्या दोन महिन्यांत तीन बैठका झाल्या. पण मुंबईतल्या शासकीय रुग्णालयात या मशीन्स आलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हय़ातील जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीन्स घेण्यासाठी निधी राखून ठेवावा. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ही मशीन्स घेण्यासाठी गरज पडल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यावर या मशीन्सच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

केईएम, शीव, नायरमध्ये समस्या

केईएम, सायन व नायर रुग्णालयातही एमआरआय, सीटी स्कॅन आणि लॅबचे साहित्य नाही. या सर्वांच्या खरेदीचे आदेश शासनाने दिले होते. पण खरेदी झाली नाही. याकडे अजय चौधरी यांनी लक्ष वेधले.