फुले आरोग्य योजनेच्या दरपत्रकात वाढ करावी! सुनील शिंदे यांची मागणी

महागाईमुळे तसेच सर्वच शस्त्रक्रियांचे वैद्यकीय साहित्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय साहित्यांच्या दरपत्रकात तातडीने बदल करून सुधारित दरपत्रक लागू करावे तसेच रुग्णालयांतील अधिष्ठातांच्या अधिकारातील मदत निधी 15 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषदेत केली. गरीब रुग्णांवर वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी ‘महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना’ वरदान ठरली आहे, परंतु या योजनेच्या मदत मिळण्याच्या निकषांत गेल्या पाच वर्षांपासून सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. एखाद्या रुग्णाला स्टेन्ट टाकायच्या शस्त्रक्रियेसाठी आजही केवळ 40 हजारांची मदत दिली जाते, परंतु गेल्या पाच वर्षांत स्टेन्टचा दर 70 हजार रुपयांपर्यंत गेला असल्याने पैशांअभावी शस्त्रकिया रखडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या योजनेतील दरपत्रकात तातडीने बदल करून सुधारित दरपत्रक लागू करण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली.