
संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारची कसोटी लागणार आहे. देशातील महत्त्वाच्या व जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर ‘इंडिया’ आघाडी सरकारवर जोरदार फायरिंग करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ का थांबवले, युद्धविराम का केला, याचा जाब मोदी सरकारला विचारला जाणार आहे. पहलगाम हल्ला ही सुरक्षा यंत्रणेची गंभीर चूक होती, अशी कबुली जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे.
हल्लेखोर अद्याप फरार आहेत. त्यातच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्ष मीच थांबवला, या संघर्षात पाच लढाऊ विमाने पडली असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. या घडामोडींमुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. पहलगाम हल्ला व ‘ऑपरेशन सिंदूर’चे सत्य जनतेला समजण्यासाठी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी याआधी केली होती, मात्र सरकारने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हा विषय आता अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’सह मणिपूर हिंसाचारावर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी संसदेत निवेदन द्यावे, असा आग्रह विरोधक धरणार आहेत.
आठ विधेयके मांडली जाणार?
भारतीय प्रबंधन संशोधन विधेयक, मणिपूरशी संबंधित जीएसटी विधेयक, खनिज संशोधन विधेयक, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक संशोधन विधेयक ही आठ विधेयके अधिवेशनात मांडण्याचा सरकारचा विचार आहे.
हे मुद्दे गाजणार…
- पहलगाम दहशतवादी हल्ला
- युद्धविरामावर ट्रम्प यांचे दावे
- बिहारमधील मतदार फेरतपासणी
- अहमदाबाद विमान दुर्घटना
- मणिपूरमधील हिंसाचार
- जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा
- महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी
- शेतकरी आत्महत्या
- दिल्लीतील गोरगरीबांच्या झोपड्यांवरील कारवाई
लोकसभा अध्यक्षांनी नाही, नड्डांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. सामान्यपणे लोकसभेचे अध्यक्ष ही बैठक बोलावतात. यावेळी भाजपचे अध्यक्ष असलेले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सरकार चर्चेस तयार
अधिवेशनात सरकार विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देईल. विरोधकांनी सहकार्य करून अधिवेशन सुरळीत होऊ द्यावे, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.
मोदी निघाले विदेशात
अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी 23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. 23 ते 26 जुलै या कालावधीत ते इंग्लंड आणि मालदीवचा दौरा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.
इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य दिनानंतरही कामकाज
पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाच्या नंतरही पावसाळी अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तीन-चार दिवस आधी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजते, मात्र यावेळी अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालेल. खासदारांना 15 ऑगस्टला मतदारसंघात उपस्थित राहता यावे म्हणून 12 ते 18 ऑगस्टदरम्यान कामकाज बंद राहील.