मुंबई विद्यापीठाने 2023-2024 या शैक्षणिक वर्षाच्या 1 लाख 25 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले. हे सर्व 22 पदवी परीक्षांचे निकाल 30 दिवसाच्या आत जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे. यात बीकॉम, बीए, बीएससी, बीएमएस, बीए एमएमसी, बीएससी आयटी, बीआर्किटेक्चर या परीक्षा बरोबर एकूण 22 पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.
मुंबई विद्यापीठातून दरवर्षी 10 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशी उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया चार ते पाच महिने आधीपासूनच सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जून महिन्यात निकालाची आवश्यकता असते. निकालानंतर त्यांना महाविद्यालयातून ट्रान्सस्क्रिप्ट घेऊन वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसमार्फत परदेशातील विद्यापीठात पाठवायचे असते. पदवीचे निकाल लवकर जाहीर झाल्याने परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. तसेच देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठीदेखील विद्यार्थ्यांना लवकर निकाल जाहीर झाल्याचा फायदा झाला आहे. उन्हाळी सत्राचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विशेष सल्लागार डॉ. प्रसाद कारंडे तसेच मार्गदर्शक माजी प्रकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. टी.ए. शिवारे, माजी कुलसचिव डॉ. एम.एस. कुऱहाडे यांनी विशेष लक्ष दिले.