
रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मतदारसंघात तब्बल 85 हजार 911 दुबार मतदार असून त्यातील तब्बल 11 हजार 600 जणांनी दोनदा मतदान करून लोकशाहीला हरताळ फासल्याचा आरोप शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे. ही दुबार नावे वगळण्याचा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतरही अधिकारी टाळाटाळ करीत असून लोकशाहीची हत्या तत्काळ थांबवा, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला.
दुबार मतदारांची आकडेवारी
पनवेल मतदारसंघात 85 हजार 211 नावे ही दुबार मतदारांची नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी 25 हजार 855 हे पनवेल मतदारसंघात दोनवेळा नाव असलेले मतदार आहेत. पनवेल आणि उरण या दोन्ही ठिकाणी नावे असलेले 27 हजार 275 दुबार मतदार आहेत. ऐरोली या मतदारसंघात 16 हजार 96 तर पनवेल आणि बेलापूर मतदारसंघात दोनदा नावे असलेले 15 हजार 397 मतदार असल्याची माहिती बाळाराम पाटील यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्यावरून संपूर्ण देशात रान पेटवले आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात मतचोरी झाल्याचा पुराव्यासह भंडाफोड झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. या पाश्र्वभूमीवर बाळाराम पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाल्याचा थेट आरोप करीत मतचोरीची आकडेवारीच सादर केली.
कोर्टाच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांचा कानाडोळा पनवेल मतदारसंघातील यादीत नावे
नोंदवण्यात आलेल्या 580 मतदारांचा कुठेही थांगपत्ताच नाही. एकूण 85 हजार 211 दुबार मतदार सापडल्यानंतर त्याची तक्रार 10 सप्टेंबर 202४ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आणि याप्रकरणी कारवाई करण्याचा आग्रहही करण्यात आला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 202४ रोजी मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने ही दुबार नावे वगळण्याचा आदेश दिला. परंतु अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.
वोट चोर गद्दी छोड भाईंदरमध्ये मशाल मोर्चा
भाईंदर – मीरा-भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मतचोरी विरोधात मशाल मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली शांतीनगर, राजीव गांधी चौक, रसाज येथून मीरा रोड रेल्वे स्टेशनपर्यंत मशाल मोर्चा काढला. यावेळी सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा जाहीर निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. ‘बोट चोर गद्दी छोड’, ‘भाजप सरकारचे करायचं काय.. खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. मतचोरी करून निवडणुका जिंकलेल्या भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप प्रमोद सामंत यांनी आला.
गली गली मे शोर है… उल्हासनगरात कॅण्डल मार्च
उल्हासनगर भाजपने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा आरोप करत काँग्रेसने आज उल्हासनगरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयापासून नेहरू चौकापर्यंत कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. ‘गली गली में शोर है मोदी सरकार चोर हैं’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपचा बुरखा फाडला. आंदोलनात नानिक आहुजा, सुनील बेहरानी, पवन मिरानी, आशेराम टाक, राजेश मल्होत्रा, दीपक सोनवणे, फामिदा शेख आदी सहभागी झाले होते.