
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. पण दुषित अन्न पाणी, पाऊस, झालेली गैरसोय यामुळे अनेक आंदोलनकर्त्यांची तब्येत बिघडली आहे. आझाद मैदानात आतापर्यंत 2300 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. अनेक आंदोलनकर्त्यांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी सारखी लक्षण जाणवत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिबिरानुसार, सोमवार सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 या वेळेतच 1,326 आंदोलनकर्त्यांवर उपचार करण्यात आले. पहिल्या तीन दिवसांत 1,037 रुग्णांची नोंद झाली होती. अशाप्रकारे आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 2,360 वर पोहोचली आहे.
सर्दी, ताप, घसा खवखवणे, सांधेदुखी आणि उच्च रक्तदाबाची प्रकरणे वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दूषित पाणी आणि अन्न, अपुरी हवा खेळती न राहणे आणि सतत पावसात भिजणे यामुळे पोटाच्या विकारांचे, जुलाब आणि त्वचारोगाचे रुग्णही बरेच आढळले आहेत. काही ठिकाणी छातीत दुखणे, स्ट्रोक्स आणि लेप्टोस्पायरोसिसचा संशयास्पद काही रुग्ण देखील आढळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार किमान 12 डॉक्टर सतत 12-तासांच्या शिफ्टमध्ये रुग्णांवर उपचार करत आहेत, तेही मुसळधार पावसात. आंदोलक खूप गर्दीत आहेत आणि त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. व्हायरल फिव्हर, पोटाचे विकार, सांधेदुखी आणि घसा दुखणे ही रोजची प्रकरणं आहेत. आम्ही सतत लक्ष ठेवून प्राथमिक उपचार देत आहोत, असे पालिकेच्या शिबिरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हबीब खान यांनी सांगितले.
जीटी रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत साधारण 60 ते 70 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आले, त्यापैकी 9 ते 10 जणांना उपचारासाठी दाखल करावे लागले. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, “बहुतेक रुग्णांना दूषित अन्न-पाण्यामुळे ताप आणि जुलाब होत होते. काहींना छातीत दुखत होते, पण ते प्रामुख्याने अॅसिडिटीमुळे होते.” डॉक्टरांनी सांगितले की सर्व रुग्णांचे मोफत उपचार करून त्यांना दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालिकेसोबतच मराठा समितीनेही आपले स्वतंत्र शिबिर उभारले आहे, जिथे राज्यभरातून आलेले सात स्वयंसेवक डॉक्टर काम करत आहेत. मात्र त्यांनी संसाधनांच्या प्रचंड टंचाई असल्याचे म्हटले आहे. इथे केवळ प्राथमिक औषधे आहेत, अगदी पालिकेच्या शिबिरातसुद्धा ड्रेसिंगची कमतरता आहे अशी माहिती नायर हॉस्पिटलचे डॉ. विवेक सुरवसे यांनी सांगितले. तसेच रुग्णांमध्ये तोंडाला अल्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे तसेच अनेक आंदोलक अनवाणी चालतात त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.