31 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 31 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. तसेच नक्षलवाद्यांचे 150 हून अधिक बंकरही नष्ट करण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. छत्तीसगडचे डीजीपी अरुण देव गौतम आणि सीआरपीएफ डीजी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही करेगुट्टा टेकडीवर 21 दिवसांपासून सातत्याने हे शोधमोहीम सुरू होती. या कारवाईत राज्य पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या सहकार्याने 31 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले. यापैकी 28 जणांची ओळख पटली आहे तर इतर तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर तब्बल 1.72 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.