
2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आल्याला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला. तरीही तब्बल 5 हजार 956 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात असल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत चलनात असलेल्या 2 हजार नोटांबाबतची ही आकडेवारी आहे.
19 मे 2023 रोजी 2 हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करतेवेळी 2 हजारांच्या तब्बल 3.56 लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या एकूण 98.33 टक्के नोटा परत करण्यात आल्या आहेत. मात्र 2 हजार रुपयांच्या नोटांचा अद्यापही वैध चलन म्हणून वापर करण्यात येत आहे. मात्र, या नोटांचा आर्थिक व्यवहारात वापर करण्यासाठी बंदी आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. या नोटा बदलण्याची सुविधा 19 मे 2023 पासून बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय 9 ऑक्टोबर 2023 पासून या कार्यालयांमध्ये कुणीही व्यक्ती किंवा कंपन्या 2 हजार रुपयांच्या नोटा आपल्या बँक खात्यांत जमाही करू शकतात.
सर्वसामान्य नागरिक देशातील कुठल्याही पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून 2 हजार रुपयांच्या नोटा बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी आरबीआयच्या कार्यालयांमध्ये पाठवू शकतात. अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे आरबीआयची कार्यालये आहेत.