मोरूची मावशी गेली!

विजय चव्हाण

सामना ऑनलाईन, मुंबई

ती आली, तिनं  पाहिलं आणि तिनं जिंकलं…टांग टिंग टिंगाकच्या टुंगवर तिने कित्येक वर्षे रसिकांना झुलवले. तिने टाळय़ा घेतल्या, वन्समोअर घेतले. प्रेक्षकांना खदखदून हसवले. तिने प्रत्येक घरात आणि हृदयात अढळ स्थान मिळवले. गेली तीन-चार दशके मोरूची मावशी म्हणजे मराठी रंगभूमीवरचं समजण्यापलीकडंच समीकरणच जणू. ही मावशी साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मोरूची मावशीच आपल्यातून गेली, अशा भावना नाटय़रसिक आणि कलाकार व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून विजय चव्हाण यांची प्रकृती ठीक नव्हती. फुप्फुसाच्या आजारामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा वरद असा परिवार आहे.

लालबाग ते रुपेरी पडदा व्हाया शिवाजी मंदिर

लालबाग-परळने अनेक दिग्गज कलाकार मराठी रंगभूमी, सिनेसृष्टीला दिले. त्यापैकीच एक म्हणजे विजय चव्हाण. लालबागमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भारतमाता चित्रपटगृहाजवळील हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. अभिनयाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. लहानपणी लालबाग-परळ भागात विविध स्पर्धांमध्ये ते हिरिरीने भाग घ्यायचे. वडिलांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी त्याकाळी अनेक स्पर्धा गाजवल्या.

‘वहिनीची माया’मधून मोठय़ा पडद्यावर

हरहुन्नरी अभिनेते विजय चव्हाण यांनी सुमारे 350 हून अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 1985 साली त्यांनी ‘वाहिनीची माया’ या चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘जत्रा’, ‘पछाडलेला’, ‘झपाटलेला’, ‘नाना-मामा’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘माहेरची साडी’, ‘हलाल’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

सहाय्यक भूमिकेतही छाप पाडली

महेश कोठारे यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात विजय चव्हाण यांना संधी दिली. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव या विनोदी नायकांबरोबर सहाय्यक कलाकार म्हणून काम करूनही आपल्या अभिनयामुळे विजय चव्हाण सर्वांच्या लक्षात राहतात.

चित्रपट सेनेची मदत पोहोचली, पण…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेने अडीच लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर ही यंत्रणा दोन दिवसांपूर्वीच विजय चव्हाण यांच्या घरी पोहोचवली. मात्र त्याच दिवशी चव्हाण यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

आजारपणातही सोडली नाही कलेची साथ

कलेवर मनापासून प्रेम करणाऱया कलावंतांपैकी विजय चव्हाण एक होते. ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे वारंवार पाय सुजत होते. त्यावेळी फुप्फुसं कमकुवत झाली असून रोज दिवसातील काही तास तरी ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागणार असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. अशा अवस्थेतही ते ऍम्ब्युलन्स घेऊन कोल्हापूरला गेले आणि या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले. ऑक्सिजन सिलिंडरही ते सेटवर घेऊन जायचे.