
आईने पोटच्या तीन मुलींसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीतील फेणे गावात घडली आहे. पुनिता भारती (३२), नंदिनी भारती (१२), नेहा भारती (७), अनू (४) भारती अशी मृतांची नावे आहेत. या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
फेणे गावातील एका चाळीत लालजी भारती हा पत्नी आणि तीन मुलींसह राहत होता. काही दिवसांपूर्वी भारती कुटुंबीय या परिसरात राहायला आले होते. लालजी हे यंत्रमाग कामगार आहेत. लालजी शुक्रवारी रात्री कामावर गेले. रात्रपाळी करून ते शनिवारी सकाळी ९ वाजता परत आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. बराच वेळ झाला तरी कोणीही दरवाजा उघडला नाही. अखेर लालजी यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. छताला पत्नीसह तीनही मुली टांगलेल्या अवस्थेत आढळून आल्या. काय करू अशी त्यांची मनः स्थिती झाली होती. हतबल झालेल्या लालजी यांनी टाहो फोडत दरवाजा तोडला.
सुसाईड नोट सापडली
घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतले. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. यात हे मी स्वतःच्या मर्जीने करीत असून यात कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते. तरी या महिलेने मुलींसह आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
ही हृदयद्रावक घटना आहे. पोलीस या गुन्ह्याचा सर्व बाजूने तपास करीत आहे. शवविच्छेदनात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण नक्की आत्महत्या का व कशासाठी केली याचा शोध सुरू आहे.
– कृष्णराव खराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक